IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

सौ.आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे.

लग्न पाहिलं (पुन्हा) करून....      [सौजन्य - आपले जग]
 स्त्री शिक्षणाची गंगा अविरत व्हावी म्हणून ज्यांनी भगिरथ प्रयत्न केले त्या महर्षी अण्णासाहेब ऊर्फ धोंडो केशव कर्वे यांची द्वितीय पत्नी म्हणजे सौ.आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे. स्वत:चा संसार सावरत, अनेकांचे संसार त्यांनी मार्गी लावले. सौ.आनंदीबाई कर्वे यांनीही समाजाची अवहेलना सोसत समाजसेवा केली.
 सौ.आनंदीबाइंर्चा जन्म १८६५ सालचा. देवरुखच्या पावसकर जोशांपैकी बाळकृष्ण केशव जोशी यांचे सातवे अपत्य म्हणजे गोदूबाई. लहानपणीच गोवर आला. तान्ह्या गोदाला दूध देण्याची आवश्यकता होती म्हणून बाळकृष्ण पंतांनी म्हैस आणली; पण तिच्या खाण्याचा खर्च भागवावा तर दूध, तूप विकण्याचे पाप ब्राह्मणांनी करायचे नाही असा दंडक होता; तरीही  बाळकृष्णबुवांनी गुपचूपपणे तूप विकून खर्च भागवला.
 गोदा व पाठची कृष्णा या दोघींना देवी आल्या. आजारातून कृष्णा जगली नाही; गोदा मात्र वाचली. तिची प्रतिकारशक्ती चांगली होती म्हणूनच पुढे तिला काही कर्तृत्त्व दाखवता आले. गोदा अंगापिंडाने तशी थोराडच होती. वयाच्या आठव्या वर्षीच अचानक तिचे लग्न झाले. घरात लग्नाचा विषय कुणाच्या मनातही नव्हता. पण लग्न झालेली तिची आतेबहीण देवीच्याच रोगाने मृत्यूमुखी पडली. रिकामी झालेली ही जागा गोदाने भरून काढावी असे सुचवले गेले व तसे घडलेही! गोदाचे लग्न नातू यांच्याशी झाले. ते वीस वर्षांचे होते. बी.ए.पर्यंत शिकून फेलोशिप प्राप्त केलेले होते. गोदाचे सासर समृद्ध होते. दोन्हीकडचा खर्च नातंूनीच केला. गोदाच्या वडिलांनी वरदक्षिणा म्हणून २० रु. व मांडव परतणे म्हणून दूधभाताचे जेवण सर्वांना दिले. ज्येष्ठात हे लग्न झाले.
 गोदाबाय आता सौ.यशोदाबाई नातू म्हणून माखजनच्या वाड्यात प्रवेशली. आठ वर्षांची गोदा माहेरीच असताना ऋषीपंचमीच्या दिवशी दु:खद वार्ता आली. नातू गेले. गोदा विधवा झाली! गोदाबाई तीन वर्षेे माहेरीच होत्या. मग सासरहून पत्र आले. यशोदेला (गोदाला) पाठवून द्या. आम्ही तिला आमचा मुलगाच मानू! पाठवावे की नाही यावर थोडा विचार झाला, पण खायचे एक तोंड कमी होईल या विचाराने गोदाची पाठवणी सासरी झाली. पातळ नेसवून तिला पाठवली, कारण आता ती अकरा वर्षांची झाली होती. गोदाबाइंर्चे सासू-सासरे प्रेमळ होते. घरात दोघे दीर होते, ते लाडोबा होते. त्यामुळे शेतावरची सर्व कामे गोदाबायकडे आली. सकेशा विधवा म्हणून स्वयंपाकघरात जायला बंदी, पण भल्या पहाटे उठून पाणी भरण्याचे काम तिलाच करावे लागे. न्याहरी करून व बरोबर घेऊन ती शेतावर जायची. बारा वर्षे गोदाबाय सासरी राबत होत्या. वर्षातून एकदा महिनाभर त्यांना दिवाळीसाठी माहेरी पाठवले जाई.
 गोदाबायच्या सासूबाई वृद्धत्वाकडे झुकू लागल्या. त्यांनी गोदाला बरेच व्यवहारज्ञान शिकवले. बालविधवा म्हणजे समाजात बेवारस पडलेली वस्तू असे समजले जाई. प्रेमळ सासूला दुखवणे गोदाला अवघड झाले अन् तिने केशवपनास मान्यता दिली.
 केशवपनास गोदा मनाने तयार नव्हती, पण मारझोड टाळण्यासाठीच तिने मान्यता दिली. गोदाच्या वागण्या-बोलण्यात फारच फरक पडला. गोदा घरात कोंडली गेली. व्रतवैकल्ये तिच्या मागे लागली. गोदाला मुंबईला घेऊन जावे असे तिच्या भावाला वाटले व गोदाच्या सासरी पत्र पाठवले - `गोदाच्या ताईची तब्येत बिघडली आहे. तिला भेटण्यासाठी गोदाला पाठवून द्यावे.'
 गोदा माहेरी आली. गोदाचा दादा तिला शिकवावे या मताचा होता. तो तिला घेऊन मुंबईला आपल्या बिऱ्हाडी आला. हे बिऱ्हाड सार्वजनिक होते. या बिऱ्हाडात अनेक विद्यार्थी होते. ते शिकण्यासाठी मुंबईत आले होते. शिवाय अण्णासाहेब कर्वे, त्यांच्या पत्नी राधाबाई व मुलगा रघुनाथ होता. या सर्वांचे स्वयंपाकपाणी एकत्र होते. राधाबाई व गोदेची भावजय दोघी मिळून पंधरा-वीसजणींचा स्वयंपाक करीत. पाणी चौथ्या मजल्यावर आणावे लागे. गोदाचे नाव तिच्या दादाने शारदासदनात घातले होते. शारदासदनची गोदाबाय ही दुसरी विद्यार्थिनी. वर्षाला रु.५० दादाला द्यायचे या बोलीवर गोदाबाय शारदासदनात रहायला आल्या व पूर्णवेळ शिक्षणासाठी त्यांना मिळाला. पंडिता रमाबाइंर्ची कन्या `मनोरमा' हिची देखरेख करण्याचे काम त्यांना होते व स्वत:चा स्वयंपाकही त्यांना काही दिवस करावा लागला.
 हळूहळू गोड बोलून रमाबाइंर्नी गोदाबायला केस वाढवायला उद्युक्त केले. वाढलेले केस इतरांच्या लक्षात येऊ नयेत म्हणून डोक्यावरून पदर घेऊन गळयापाशी त्या पीन घट्ट करून लावीत असत. थोड्याच दिवसात शारदा सदन ही संस्था पुण्यात आगाखानच्या बंगल्याजवळ आली. मधल्या काही काळात अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी सौ.राधाबाई कालवश झाल्या. कर्वे यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. तेही पुण्यात आले. गोदाचे बाबा काही कामानिमित्त पुण्यास आले व कर्वे यांचेकडे जाऊन त्यांना `पुन्हा लग्न करणार का' म्हणून त्यांनी विचारले. कर्वे म्हणाले, ``लग्न करायचं आहे, पण ते विधवेशी'' बाळकृष्णबुवा जोशी म्हणाले, ``मग आमच्या गोदाशीच का करीत नाही?'' कर्वे म्हणाले, ``तिची संमती असेल तर तिच्याशी करीन.''
 गोदाचे बाबा शारदासदनमध्ये तिला भेटायला आले व लग्नाबद्दल त्यांनी विचारले. गोदाला कर्वे यांचा स्वभाव माहीत होता, कारण ती जेव्हा गोपीनाथांच्या चाळीत दादाच्या बिऱ्हाडी होती तेव्हा कर्वेही तिथेच होते. तिने संमती दिली. बाबांनी रमाबाइंर्ना विचारले त्या म्हणाल्या, ``कर्वे इतके कृश आहेत की, पुन्हा काही घडायला नको. वर्षभर थांबू या.'' वर्ष गेलं. रमाबाइंर्नी कर्वे यांजकडून रु.३० हजारची पॉलिसी गोदाच्या नावाने करून घेतली व लग्नाला संमती दिली. लग्न ठरल्यावर कर्वे शारदासदनमध्ये येऊन गोदाला भेटले व म्हणाले, ``या शारदासदनात श्रीमंती थाटाने राहायची तुम्हाला सवय लागलीय. मी गरीब आहे अन् गरिबीतच राहणार आहे. जन्मभर गरिबी पत्करायची तयारी असेल तर हो म्हणा.'' गोदाबाय हो म्हणाल्या.
 पुण्यातला हा दुसरा विधवा विवाह. प्रि.आगरकर व रामभाऊ जोशींनी विवाहाच्या निमंत्रणपत्रिका काढल्या. हा विवाह लावण्यासाठी भिकंभट वझे नावाचे पुरोहित मालवणहून पुण्यात आले व १३ मार्च १८९३ या दिवशी हा विवाह डॉ.भांडारकरांच्या बंगल्यात झाला. १३ मार्च हा शारदासदनचा वर्धापनदिन, म्हणून शारदासदनने संध्याकाळी नवदांपत्याला बोलावून बुंदीचे जेवण दिले.
 शारदासदन पुण्यात आल्याने मुलींची संख्या खूप वाढली होती. नवदांपत्याला निरोप देताना त्या मुलींनी काव्यात आपली अपेक्षा व्यक्त केली. त्या म्हणाल्या नांदा सौख्यभरे प्रसन्न हृदये या सृष्टिमाजी तुम्ही ।
लोकां साह्य करोनि कीर्ती मिळवा इच्छितसो ह्या अम्ही ।
वैधव्याग्रित शेकडो जळती ज्या प्रारब्धभोगे स्त्रिया ।
ज्याते मानिति तुच्छ आर्यजन त्या, रक्षी करूनी दया ।।
 मग त्या मुलींनी नवदांपत्याला उखाणा घ्यायला सांगितले. कर्वे म्हणाले,
`शारदासदनचे माझ्यावर झालेत उपकार फार,
ते फेडायला आनंदीने लवकर व्हावे तय्यार'
टाळयांचा कडकडाट झाला, पण गोदाबायने म्हणजे सौ.आनंदीबाई धोंडो कर्वे यांनी नाव घ्यायला स्पष्ट नकार दिला. कारण `धोंडो' हे नाव त्यांना अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे पुढेही त्यांनी कधी उखाण्यातून नाव घेतले नाही.
 सौ.आनंदीबाई पुनर्विवाहाने आनंदित झाल्या खऱ्या, पण समाजाची अवहेलना त्यांना सोसावी लागली. ह्या नवदांपत्याला होरपळत जगावे लागले, कर्वे म्हणत, `मी समाजमनाविरुद्ध वागलो आहे; त्यामुळे समाज देईल ती शिक्षा मी निमूटपणे भोगणार आहे, पण थोड्याच काळात समाज समंजस होईल व माझेच गुणगान गाईल हे निश्चित आहे.'
(महर्षि कर्वे भारतरत्न होऊन शतकोत्तर जगले. बाया कर्वेही तशा दीर्घायुषी. या दांपत्त्याने स्त्रीशिक्षण व सामाजिक दृष्टिकोण या संदर्भात नवी दिशा दिली.)
- सौ.वसुधा ग. परांजपे, पुणे
(`आदिमाता' वरून....)


No comments:

Post a Comment